मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंसह विरोधी पक्षांनी ईव्हीएमबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे देशभर विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षातील नेते ईव्हीएमविरोधात आघाडी उघडण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मात्र ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही, तसेच मशीनची सुरक्षा तोडणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
२० हजार ६८७ व्हीव्हीपॅटमधील मतांची संबंधित ईव्हीएममधील मतांशी तुलना केली असता फक्त आठ व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळणी झाली नाही. सव्वा कोटी मतांच्या गणनेत केवळ ५१ मते म्हणजे ०.०००४ टक्के जुळली गेली नाहीत, ही गफलत मानवी चुकांमुळे झाली. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सिंग यांनी केले.