Join us

‘ईव्हीएम’ एकदम सुरक्षित; सीसीटीव्ही, त्रिस्तरीय सुरक्षा! गोरेगाव, विक्रोळी, शिवडीत स्ट्राँगरूम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:46 AM

मुंबईतील सहा मतदारसंघात ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उपनगरात चार जागांसाठी ८७ उमेदवार, तर मुंबई शहर जिल्ह्यात दोन जागांसाठी २९ उमेदवार, असे एकूण ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याकरिता नऊ हजार ९०२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या सर्व मतदारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंदिस्त झाले असून, ही यंत्रे गोरेगाव, विक्रोळी आणि शिवडी येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 

५३ लाख मतदारांनी बजावला हक्क -

१) मुंबईतील सहा मतदारसंघात ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार आहेत. त्यापैकी ५३ लाख ७३ हजार ४६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

२) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची मतमोजणी नेस्को, गोरेगाव येथे होणार आहे. 

३) तसेच उर्वरित मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार आहे. आणि दक्षिण मुंबई आणि मध्य मतदारसंघाची मतमोजणी शिवडी वेअरहाऊस, सीएफएस एरिया, शिवडी येथे होणार आहे.

प्रवेशाला बंदी-

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून या स्ट्राँग रूमला सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि मुंबई पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून वॉच ठेवला जात आहे.  सर्व स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षिततेचे कोंदण आहे. स्ट्राँग रूममध्ये इतर कोणत्याही लोकांना प्रवेश नसतो. निवडणूक अधिकारी त्याची पाहणी करतात. स्ट्राँग रूममधील ईव्हीएम नेण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा उपाययोजना, स्ट्राँग रूममधील रजिस्टर्सची देखभाल याची माहिती घेतल्याचे उपनिवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

दिवसातून तीन अधिकाऱ्यांची भेट -

या स्ट्राँग रूमला दिवसातून तीन उच्च अधिकाऱ्यांकडून भेट दिली जाते. त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला दिला जातो. मुंबईतील तिन्ही स्ट्राँग रूम सुरक्षित आहेत की नाही, यासाठी उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी स्वतः स्ट्राँग रूमला भेट दिली आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४एव्हीएम मशीन