Join us

प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर चाकूने वार करत माजी प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:13 AM

प्रेयसीचे अन्य मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजताच, ‘माझी नाही तर कुणाचीच नाही...’ म्हणत माजी प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर चाकूने वार केले.

मुंबई : प्रेयसीचे अन्य मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजताच, ‘माझी नाही तर कुणाचीच नाही...’ म्हणत माजी प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर चाकूने वार केले. दोघांवर हल्ला करत, स्वत:लाही संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली. या प्रकरणी बुधवारी मानखुर्द पोलिसांनी पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला असलेला माजी प्रियकर चंद्रकांत कांबळे उर्फ चंदू (३४) याला बेड्या ठोकल्या आहेत.मूळची रायगडची रहिवासी असलेली प्रिया (१९, नावात बदल) हिचे तेथीलच चंद्रकांत साळुंखे उर्फ चंदू(३४) सोबत गेल्या ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने तिने दुर्लक्ष केले. त्याच्यासोबत लग्नाला नकार दिला. पुढे बारावीच्या शिक्षणानंतर ती मानखुर्दच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नोकरीला लागली. येथीलच पीएमजीपी कॉलनीमध्ये ती राहत होती. येथेच काम करत असलेल्या आकाश कांबळेसोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. चंदू हा पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरी करतो. तो पुण्याहून प्रियाला भेटण्यासाठी मुंबईत येत असे. मात्र, प्रिया त्याला टाळत होती.गेल्या वर्षभरापासून प्रिया आणि आकाशमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती चंदूला मिळाली. २९ तारखेला चंदूने मुंबई गाठली. पीएमजीपी कॉलनीत प्रियाकडे याबाबत जाब विचारला, तेव्हा तिने आकाशसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्याला निघून जाण्यास सांगितले.याच रागात, ‘माझी नाही, तर कुणाचीच नाही म्हणत,’ सोबत आणलेल्या चाकूने त्याने प्रियाच्या मानेवर वार केले आणि स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान आकाशने मध्यस्थी घेतली, तेव्हा त्याच्याही मानेवर वार करण्यात आले.तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी, प्रियाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी त्याला या गुन्ह्यांत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ११ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीरिलेशनशिप