लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ३.४४ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या माजी ब्रँच मॅनेजरसह एका कमिशन एजंटला दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच १.७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. संजय सावल आणि रोमन पटेल अशी त्या आरोपींची नावे आहेत.
१४ जानेवारी २००३ ते १५ सप्टेंबर २००९ या कालावधीत रोमन पटेल याने गिरगाव येथील ब्रँचमध्ये १२ खाती सुरू केली. त्यातील ६ खात्यांमधून त्याने २५ लाखांचे कर्ज काढले. हे कर्ज बँक मॅनेजर संजय सावल याने नियमबाह्य पद्धतीने मंजूर केले. सीबीआयने याबाबत बाजू मांडताना कोर्टात सांगितले की, ब्रँच मॅनेजरपदी असताना नियम डावलून आरोपीने कर्ज मंजूर केले, कमिशन एजंटने या बँक खात्यात कमीत कमी पैसेदेखील ठेवले नाहीत. ओव्हरड्राफ्टचे पैसेदेखील भरले नाहीत. या दोघांनी बँकेतून पैसे उकळण्यासाठी कट रचला. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनावली.