मुंबई : कोरोना काळातील मृतदेहांसाठीच्या बॅग खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव घेण्यात येत असून, त्याबाबतचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. कोविडग्रस्ताच्या मृतदेहासाठीच्या बॅग २ हजार रुपयांत एक कंपनी देत असताना, पालिकेला पुरवठा करणाऱ्या कंपनीने मात्र ६ हजार ८०० रुपयांना विकल्याचे उघडकीस आले आहे. किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार हे टेंडर संबंधित कंपनीला देण्यात आल्याची माहिती ईडीला मिळाल्याचे कळते.
याबाबत पेडणेकर यांना विचारणा करताच, या आरोपांना अर्थ नाही. कोरोना काळात रस्त्यावर उतरून सेवा बजावली. महापौर म्हणून प्रतिमा मलिन करण्यास वेगळे मार्ग न राहिल्याने अशा पद्धतीने आरोप करण्यात येत आहे. महापौरांना खरेच एवढे अधिकार असतात का? माझ्या शब्दाला एवढी किंमत होती तर पेन्शनधारक, पिटी केस संबंधित तक्रारीही निकाली लावल्या असत्या. मुळात यामध्ये प्रशासकीय मान्यतेशिवाय कुठलेही निर्णय होत नाहीत. मी प्रामाणिकपणे काम केले आहे. यामध्ये माझा काहीही संबंध नाही. किंवा मी कुणालाही सूचना दिल्या नाहीत, असे त्यांनी नमूद केले.