मुंबई- आताच्या घडीला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज अमान्य केला आहे. यानंतर आता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं असताना आता अपक्ष आमदार व राज्याचे माजी मंत्री बच्चू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळावा हा राज्याचा हिताचा निर्णय नाही. मेळाव्यामुळे पक्षाचं हित होणार, जनतेचं नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच 'हमारी औकात क्या है' दाखवण्यासाठी दसरा मेळावा असल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. आमचा प्रहार पक्ष आहे. आमचा मेळावा नाही. आम्ही लोकसेवा करतो, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या अन् आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जमीन दाखविण्याची भाषा करीत आहात, आम्ही तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दिले. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित केल्यास उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटांपैकी कोणत्याही एका गटास परवानगी दिली तर शिवाजी पार्क सारख्या संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने दिल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही गटांचा अर्ज बुधवारी फेटाळल्याची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आता शुक्रवारी ठेवली आहे.
शिवसेनेची याचिका दिशाभूल करणारी- शिंदे गट
शिंदे गट हीच खरी शिवसेना, असा दावा करत स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिंदे गटातर्फे उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. शिवसेनेची याचिका दिशाभूल करणारी आहे. याचिकाकर्ते म्हणून आलेल्या अनिल देसाईंकडे कोणतेच पद नसल्याने त्यांना परवानगी मागण्याचा अधिकार नाही. मुळात 'शिवसेना' कोणाची हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, असे सरवणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. तसेच, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आधी आपण परवानगी मागितली होती, असेही सरवणकर यांनी याचिकेत म्हटले आहे.