मुंबई : परळ येथील वाडिया बालरुग्णालयामध्ये पल्वरायझेशन विभाग स्थापन करण्यात आला आहे. हा विभाग शहरातील सर्व गरजू बालरुग्णांसाठी खुला आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने या विभागाला परवानगी दिली आहे. या विभागाच्या माध्यमातून रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधाच्या मात्रेमध्ये आवश्यकतेनुसार कपात करण्याच्या प्रक्रियेला पल्वरायझेशन असे म्हणतात. याचा लाभ दररोज १०-१५ बालरुग्णांना मिळत आहे आणि यामुळे वैद्यकीय व्यवस्थापनाची गती वाढण्यात मदत होणार आहे.‘पल्वरायझेशन’ प्रक्रियेत औषधाचे चूर्ण करून त्यांचे अत्यंत बारीक कणांत रूपांतर केले जाते व त्यानंतर रुग्णाच्या आवश्यकतेनुसार त्यांतून इच्छित डोस तयार केला जातो. हे तंत्र आवरण नसलेल्या (नॉन-कोटेड) टॅब्लेट्ससाठी उपयुक्त ठरते. बालरुग्णांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यात मदत करण्याच्या उद्देशाने रुग्णालयाने किमान खर्चात पल्वरायझेशन विभाग सुरू करून मोठे पाऊल उचलले आहे. डोस कपातीसाठी एक विशेष सूक्ष्म (नॅनो) वजनकाटा वापरला जात आहे.वाडिया रुग्णालयाचय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, पूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांना पल्वराइज्ड (डोस कमी केलेली) औषधे मिळविण्यासाठी बाहेरच्या केंद्रात २-३ दिवस रांगेत उभे राहावे लागत होते. औषधांचा योग्य तो डोस मिळविण्यास विलंब लागल्याने रुग्णांना बाहेरून येणाºया पल्वराइज्ड औषधांची वाट बघत अधिक काळ रुग्णालयात दाखल राहावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन रुग्णालयाने पल्वरायझेशन विभाग सुरू करण्याचा निर्णय केला.
बाळांना मिळणार वजनाइतकी औषधांची अचूक मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:04 AM