दादरमध्ये कमी वेळेत होणार अचूक अन्नचाचणी; महापालिकेच्या प्रयोगशाळेत आधुनिक यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:23 AM2020-01-13T01:23:08+5:302020-01-13T01:23:20+5:30
या चाचण्या वेगवेगळ्या उपकरणांमार्फत केल्या जातात. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असून मनुष्यबळाचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो.
मुंबई : दादर येथील जी-उत्तर विभाग कार्यालयात महापालिकेच्या मालकीची प्रयोगशाळा आहे़ यामध्ये विविध भागांतून आलेले पाणी व खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची चाचणी केली जाते़ ही चाचणी कमी वेळेत व अचूक होण्यासाठी पालिकेने आता अत्याधुनिक पद्धत अवलंबली आहे़ पावसाळ्यापर्यंत ही अन्नचाचणी यंत्रणा सुरू होणार आहे़
उपाहारगृहांमधील खाद्यपदार्थ व खासगी वसाहतींतील पाण्याचे नमुने तपासण्याचे काम या प्रयोगशाळेत शुल्क आकारून केले जाते. अशा प्रकारची मुंबईतील ही महापालिकेची एकमेव प्रयोगशाळा आहे. दरवर्षी या प्रयोगशाळेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध विभागीय जलाशयांमधून आलेले सुमारे ७० हजार पाण्याचे नमुने तपासण्यात येतात़ त्याचबरोबर शाळांना पुरविण्यात येणाºया खिचडीच्या सुमारे सहा हजार नमुन्यांची चाचणी केली जाते.
या चाचण्या वेगवेगळ्या उपकरणांमार्फत केल्या जातात. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असून मनुष्यबळाचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अन्नचाचणी विश्लेषक यंत्राची मागणी प्रयोगशाळेकडून करण्यात आली होती. त्यानुसार चाचणी यंत्राचा पुरवठा, त्यासाठीचे युनिट व प्रत्यक्ष चाचणीचे काम खाजगी कंपनीला देण्यात आले आहे़ सहा महिन्यांमध्ये ही यंत्रणा सुरू करण्याची मुदत संबंधित कंपनीला देण्यात आली आहे़
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांतील सुमारे ७० हजार पाण्याचे नमुने तपासण्यात येतात़ त्याचबरोबर शाळांना पुरविण्यात येणाºया खिचडीच्या सुमारे सहा हजार नमुन्यांची चाचणी केली जाते. आधुनिक अन्नचाचणी यंत्रणेमुळे वेळेची बचत होणार आहे व अचूक अहवाल मिळू शकेल़ ही यंत्रणा प्रयोगशाळेत बसविण्यासाठी महापालिका प्रशासन एक कोटी रुपये खर्च करणार आहे़ हे यंत्र कमी वेळात जास्त नमुने हाताळू शकते व नमुन्यांचे विश्लेषण अचूक करते. यामुळे प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन पैशांची बचत होणार आहे़