Aditya Thackeray ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इक्बाल सिंह चहल यांना मुंबई महानगरपालिका आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांना नक्की कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर आज चहल यांची मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बाल सिंह चहल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल चहल यांना मिळालेलं हे बक्षीस असल्याचा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी २ दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलं आहे. मुंबई महानगरपालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री (CM - contractor Minister) ना मदत करण्यासाठी या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस आहे," अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी इक्बाल सिंह चहल यांचा समाचार घेतला आहे.
कशी झाली चहल यांची नियुक्ती?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच मुंबई मनपाच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिवपदी काम केलेल्या भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांनी मुंबईच्या आयुक्तपदी काम करताना राजकीय स्थित्यंतरे अनुभवली आहेत. तसंच दोन्ही वेळच्या सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणारे अधिकारी म्हणूनही ते ओळखले गेले. आता चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही इक्बाल सिंह चहल यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता चहल यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झाल्याने आगामी काळातही आदित्य ठाकरे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.