‘अतिहुशार’ मोलकरणीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:31 AM2018-03-15T02:31:27+5:302018-03-15T02:31:27+5:30

अंधेरीत आठ दिवस एका जोडप्याकडे घरकामासाठी जाऊन, त्यानंतर त्यांच्याच घरातील दागिने घेऊन मोलकरीण पसार झाली.

Exaggeration of the 'highly skilled' expose | ‘अतिहुशार’ मोलकरणीचा पर्दाफाश

‘अतिहुशार’ मोलकरणीचा पर्दाफाश

googlenewsNext

मुंबई : अंधेरीत आठ दिवस एका जोडप्याकडे घरकामासाठी जाऊन, त्यानंतर त्यांच्याच घरातील दागिने घेऊन मोलकरीण पसार झाली. मुख्य म्हणजे, तिच्यापर्यंत पोहोचण्याचा एकही पुरावा तिने मागे ठेवला नव्हता. मात्र, निव्वळ ‘वर्णना’वरून क्राइम ब्रांचमधील कक्ष १०च्या अधिकाऱ्यांनी तिला मंगळवारी अटक करत चोरलेला ७० टक्के मुद्देमाल हस्तगत केला.
संगीता पाटील उर्फ ज्योती (४०) असे तिचे नाव आहे. ती दहिसरच्या केतकीपाडा परिसरात मुलगा आणि पतीसोबत राहते. गेल्या सोमवारी अंधेरीत ओल्ड नागरदास रोड परिसरात घरकामासाठी रूजू झाली. तिने स्वत:चे खोटे नाव ज्योती सांगत, भार्इंदरचा खोटा पत्ताही दिला. घरमालकानेही तिच्याबाबत कोणतीही शाहनिशा न करताच, तिला कामावर ठेऊन घेतले. आठ दिवसांत तिने त्या घरातील लोकांचा विश्वास संपादन करत, सर्व चाव्यांची माहिती करून घेतली.
दोन दिवसांपूर्वी त्या कुटुंबाला लग्नासाठी जायचे होते, त्यामुळे त्यांनी ज्योतीला सकाळी साडेसात वाजता कामावर बोलावून घेतले. कुटुंबीयांची लग्नाला जाण्यासाठी लगबग सुरू असल्याचा फायदा घेत, तिने घराची चावी हळूच काढून घेतली. ते कुटुंब लग्नाला निघून गेल्यानंतर तिने ड्रेसिंग रूमच्या ड्रॉवरमध्ये असलेल्या चावीने कपाट उघडून, त्यातील साडेतेरा लाखांचे दागिने चोरून ती रिक्षाने पसार झाली. घरमालक जेव्हा घरी परतले, तेव्हा घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याचा तपास समांतररीत्या क्राइम ब्रांचच्या कक्ष १०चे प्रभारी श्रीमंत शिंदे आणि त्यांच्या पथकाने हाती घेतला.
...आणि ते दोघे सिग्नलवर सापडले!
चौकशीदरम्यान ती कांदिवली परिसरात लपल्याची ‘टिप’ शिंदे यांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर, क्राइम ब्रांचने कांदिवली परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. या दरम्यान, एका सिग्नलजवळ पाटील आणि तिचा नवरा हातात काही सामान घेऊन फिरताना पोलिसांना दिसले. पाटीलच्या वर्णनावरून पोलिसांनी तिला अडवत, तिची चौकशी केली आणि अखेर तिने गुन्हा कबूल केला.
कोणताही ‘क्लू’ नव्हता
तिचा साधा फोटोही कोणाकडे नसल्याने तपासासाठी आवश्यक असलेला कोणताही ‘क्लू’ क्राइम ब्राचच्या हातात नव्हता. मात्र, शिंदे यांच्या पथकाने तिचे सीडीआर पडताळत, तिने यापूर्वी ज्यांच्याकडे काम केलेले, तिच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी केली. तिच्या निव्वळ वर्णनावरून पुढील शोधकार्य क्राइम ब्रांचने सुरू केले.
> ७० टक्के ऐवज हस्तगत
आम्ही चोरीला गेलेली जवळपास ७० टक्के ऐवज हस्तगत केला आहे. संबंधित महिलेला पुढील तपासासाठी अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
- श्रीमंत शिंदे, मुख्य प्रभारी,
क्राइम ब्रांच युनिट १०

Web Title: Exaggeration of the 'highly skilled' expose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.