परीक्षा रद्द, मात्र विद्यापीठाकडून संमतिपत्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:05 AM2020-07-02T02:05:02+5:302020-07-02T02:05:29+5:30

एटीकेटी व बॅकलॉगबाबत निर्णय प्रलंबित : अव्यावसायिक विद्यार्थ्यांच्या संमतिपत्राची प्रक्रिया अधांतरीच

Exam canceled, but students confused due to lack of consent from the university | परीक्षा रद्द, मात्र विद्यापीठाकडून संमतिपत्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात

परीक्षा रद्द, मात्र विद्यापीठाकडून संमतिपत्र नसल्याने विद्यार्थी संभ्रमात

googlenewsNext

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शासन स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयाद्वारे अंतिम सत्रातील अव्यावसायिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र एकीकडे व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांची मंजूरी येणे बाकी असल्याने या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय न झाल्यामुळे ऐच्छिक परीक्षांचा पर्याय असूनही मुंबई विद्यापीठाच्या बीए , बीकॉम, बीएसएस्सीच्या लाखो विद्यार्थ्यांना समंतीपत्र भरून निकालासाठी ताटकळत बसावे लागत आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर येत्या काही दिवसांत अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंची बैठक घेऊन बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत शासन स्तरावर बैठक घेऊ, अशी महिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र अद्यापही त्याबाबतचा काहीच निर्णय जाहीर करण्यात न आल्याने एटीकेटी व बॅकलॉगचे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समंतीपत्र देऊन निकाल घेता येणार आहे. मात्र, त्यासाठीचे आवश्यक संमतीपत्र अद्याप मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मिळाले नाही. परीक्षा रद्दचा निर्णय झाला मग आम्हाला ऐच्छिक संमतीपत्र भरण्यासाठी का दिले जात नाही असा सवाल विद्यार्थ्यांकडून होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यासाठी विद्यापीठातही चौकशी केली. मात्र,त्यांना उत्तर न मिळाल्याची माहिती दिली.

निर्णयावर प्रक्रिया अवलंबून
एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचा निर्णय झाला की लगेच विद्यापीठाकडून संमतीसंदर्भात परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांनी दिली. त्यांच्या अर्जामध्ये किंवा पर्याय भरण्याची व्यवस्था काय असणार ? हे कळल्यावर संमतीपत्राचा एकाच फॉरमॅट ठरविता येईल. विद्यार्थ्यांचा संभ्रम टाळण्यासाठी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतील निर्णयाची आपण वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Exam canceled, but students confused due to lack of consent from the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.