मित्रांनो तयारीला लागा ! दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 03:38 PM2017-11-29T15:38:43+5:302017-11-29T15:52:48+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं असून, दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे.
मुंबई - शैक्षणिक टप्प्यातील अत्यंत महत्वाची वर्ष असणा-या दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचं फेब्रुवारी-मार्च 2018 मधील वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं असून, दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. महत्वाचं म्हणजे अनेकदा सोशल मीडियावर खोटे वेळापत्रक व्हायरल झाल्याने विद्यार्थी चिंतेत असतात. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर संकेतस्थळ तसंच सोशल मीडियावरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात. याव्यतिरिक्त परीक्षेचं वेळापत्रक छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
त्यामुळे मित्रांनो आता तयारीला लागा. परिक्षेसाठी तुम्हाला ऑल दे बेस्ट.