Coronavirus: कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:35 AM2021-12-03T07:35:00+5:302021-12-03T07:35:28+5:30

Education News: राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Exam fees waived for students who lost their parents due to Kovid | Coronavirus: कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Coronavirus: कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Next

मुंबई : राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून लवकरच शाळा-महाविद्यालयांना निर्देश देण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक गमावले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी तसेच बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

दहावी-बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत दहावी व बारावी दोन्ही मिळून १३ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी परीक्षांसाठी झाली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्यातील किती विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळणार याच्या आकडेवारीवर सद्यस्थितीत भाष्य करता येणार नाही मात्र यासंदर्भातील सूचना शाळा आणि महाविद्यालयांना तातडीने देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज भरून घेताना शुल्क माफीची प्रक्रिया करण्यात येईल. आवेदन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची एकत्रित मंडळाकडे जमा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोट

शिक्षण विभागाने अनाथ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या बाबतीतही दिलेला दिलासा मोठा असून, त्यांचे आभार आहेत. राज्यातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांसाठी याची मदत होणार असून, त्यांच्या आर्थिक मदतीसाठी काही शिष्यवृत्तीही द्यावी, अशी आमची विनंती आहे.

- हेरंब कुलकर्णी, निमंत्रक, कोरोना एकल पुनर्वसन समिती

Web Title: Exam fees waived for students who lost their parents due to Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.