परीक्षा विद्यापीठाकडून की कॉलेजांकडून निर्णय अनिर्णीत? मुंबई विद्यापीठावर ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:31 AM2018-05-09T05:31:17+5:302018-05-09T05:31:17+5:30
सर्वच परीक्षा विद्यापीठामार्फत घेतल्याने विद्यापीठावर ताण वाढला असून कॉलेजांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्युनिअर कॉलेजांचे वेळापत्रकही बाधित होत आहे.
मुंबई - सर्वच परीक्षा विद्यापीठामार्फत घेतल्याने विद्यापीठावर ताण वाढला असून कॉलेजांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्युनिअर कॉलेजांचे वेळापत्रकही बाधित होत आहे. त्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच कॉलेजांकडे सोपवण्याची मागणी काही संघटनांकडून होत होती. दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून या संदर्भातील निर्णय आता लांबणीवर गेला आहे. नुकत्याच झालेल्या अकेडॅमिक कौन्सिलच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी दिली जाईल, असे बोलले जात होते. मात्र या बैठकीत या प्रस्तावास मान्यता मिळालेली नसून आता हा प्रस्ताव विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या कोर्टात पाठविण्यात आला आहे. परीक्षा मंडळाला यासंदर्भात अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर याबाबत अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या अकेडॅमिक कौन्सिलच्या बैठकीत या निर्णयावर सविस्तर चर्चा झाली आहे. काही तांत्रिक बाबी तपासून पाहण्यासाठी हा निर्णय आता परीक्षा मंडळाकडे पाठवला आहे. त्यांच्या अहवालानंतर अंतिम निर्णय होईल.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीत बदल करताना आणि परीक्षा पध्दतीत एकसमानता आणण्यासाठी माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षा या विद्यापीठामार्फत घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णया विरोधात प्राचार्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा पुन्हा कॉलेजांमार्फत घेण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे विद्यापीठावर ताण वाढत असून त्याचा फटका परीक्षांच्या कामावर बसत होता. त्यामुळे या परीक्षा कॉलेजांकडे सोपविण्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करुन तो पुढील मान्यतेसाठी अकेडॅमिक कौन्सिलकडे पाठविला होता. विद्यापीठाची अकेडॅमिक कौन्सिलची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली. हा प्रश्न परीक्षा विभागाशी संबंधित असल्याने तो परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आला असून त्यांना याबाबत अहवाल देण्याची सूचना केली आहे.
लवकरच निर्णय
नॅशनल फोरम फॉर क्वॉलिटी एज्युकेशनने परीक्षा विद्यापीठामार्फतच घेण्याचा आग्रह केला होता. विद्यापीठ हा निर्णय घाई करणार नसून सर्व सोपस्कर पूर्ण केल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.