मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अर्थात ‘महाज्योती’च्या वतीने एमपीएससी प्रशिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेतील निकालात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. २०० गुणांच्या या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या निकालामुळे विद्यार्थीही संभ्रमात असून, लवकरच सुधारित निकाल जाहीर केला जाईल, असे या गोंधळानंतर ‘महाज्योती’ने स्पष्ट केले आहे.
‘महाज्योती’तर्फे २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी एमपीएससी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल शनिवारी ‘महाज्योती’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला.
सुधारित निकाल लावण्याची नामुष्की
सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे ‘महाज्योती’ने स्पष्ट केले आहे.
साईटवरूनही हटवला
निकाल जाहीर करण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते. मात्र, निकालात गोंधळ झाल्यानंतर हा निकाल वेबसाइटवरून तत्काळ हटविण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना संबंधित एजन्सीने गुणांचे नॉर्मलायझेशन करण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाद्वारे वापरण्यात येणाऱ्या सूत्राचा वापर केला आहे.