मुंबई : अत्यावश्यक सेवेसाठी एसटी महामंडळाच्या बस सेवा सुरू आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून बस सेवा सुरू आहेत. या सेवा बजाविणाऱ्या एसटी कामगारांची दररोज थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करणे सुरु केले आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल येथील एसटी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली आहे. तर, उरण येथील आगारात थर्मल स्क्रिनिंग द्वारे तपासणी करण्यास सुरुरवात केली जाणार आहे.
मुंबई सेंट्रल, परळ येथील एसटीच्या आगारात कोरोनाच्या अनुशंगाने दक्षता घेणे गरजेचे होते. कारण हे दोन्ही परिसर कोरोना हॉटस्पॉटमध्ये आलेले आहे. या दोन्ही डेपोतून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या बस गाड्या धावत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षेची गरज होती. त्यामुळे चालक, वाहक, वाहतूक नियंत्रण, यांत्रिकी कर्मचारी यांची थर्मल स्क्रिनिंगमुळे तपासणी करण्यासाठी उपयोग होत आहे.
एसटी महामंडळाकडे थर्मल स्क्रिनींगच्या १०० मशीन आहेत. अद्ययावत ब्रेकडाऊन गाडीच्या किटमध्ये थर्मल स्क्रिनींग मशीन आहे. मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरू नगर, परळ आणि पनवेल येथे या मशीनचा वापर करणे सुरु झाले आहे. हि मशीन एसटी कर्मचाऱ्याच्या कपाळासमोर धरून साधारण ७ सेकंद धरली जाते. त्यानंतर यामधून शरीराचे तापमान समजणे सोपे जाते, अशी माहिती एसटी मधील सूत्रांनी दिली.