परीक्षा राज्यातील आरोग्य विभागाची; केंद्र राज्याबाहेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:47+5:302021-09-24T04:07:47+5:30
परीक्षा द्यावी की नाही, हाच प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा या खरेच विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा ...
परीक्षा द्यावी की नाही, हाच प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा या खरेच विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत असून, रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चक्क उत्तर प्रदेशातील केंद्र आल्याचा प्रकार घडला आहे. हे केवळ एक किंवा दोन विद्यार्थ्यांसोबत घडले नसून अनेक विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील केंद्र परीक्षेसाठी आल्याने गरीब विद्यार्थ्यांना आरोग्य विभागातील एकापाठोपाठ एक अशा गोंधळामुळे परीक्षा द्यावी की नाही, असा प्रश्न पडला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. यासाठी शनिवार, २५ सप्टेंबर आणि रविवार, २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ आहे. राज्यभरात आठ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून, प्रवेश पत्रापासून ते केंद्रापर्यंतच्या गोंधळामुळे उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया एमपीएससी स्टुडण्ट राईट्सचे महेश बडे यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी ब्लॅक लिस्टेड कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे हा घोळ होत असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. याआधीच्या परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रवेशपत्रावर असलेले पत्ते हे अर्धवट असल्याने नेमके कोणत्या जिल्ह्यात, कुठल्या केंद्रावर परीक्षा आहे हे उमेदवारांना समजणे कठीण होऊन बसले आहे. उद्या आणि परवा परीक्षा असल्याने हा गोंधळ आरोग्य विभाग निस्तरणार तरी कधी, असा सवाल उमेदवार विचारीत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन हा गोंधळ सोडवावा आणि विद्यार्थ्यांना आश्वस्त करावे, अशी मागणी बडे यांनी केली आहे.
उमेदवारांच्या अडचणी :
- राज्यातील विद्यार्थ्यांना राज्याबाहेर परीक्षा केंद्र, गरीब विद्यार्थ्यांची राज्याबाहेर परीक्षा केंद्र आल्याने अडचण
- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही, संकेतस्थळ अनेकदा हँग होते
- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही. पत्ता आहे मात्र तो अपूर्ण आहे.
- दोन पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य.
--------------------------------------
आरोग्य विभागातील पदे
१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरिचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक आदी
२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसाहाय्यक, पुरुष/ स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस आदी
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :
संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज
गट क : २७२५ : ४,०५,०००
गट ड : ३४६६ : ४,६१,०००