नापास झालेल्या विषयाचीच परीक्षा
By Admin | Published: April 12, 2017 02:26 AM2017-04-12T02:26:55+5:302017-04-12T02:26:55+5:30
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थी गु्रपमधील एका विषयात नापास झाल्यावर त्याला चारही पेपरची परीक्षा पुन्हा द्यावी लागत असे, परंतु आता नवीन
मुंबई : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थी गु्रपमधील एका विषयात नापास झाल्यावर त्याला चारही पेपरची परीक्षा पुन्हा द्यावी लागत असे, परंतु आता नवीन नियमानुसार, ज्या विषयाचा पेपर राहिला आहे, तोच पेपर द्यावा लागेल. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
एम.ए, एम.कॉम, एमएससी या परीक्षा सीबीजीएसनुसार न घेता, आतापर्यंत जुन्या पद्धतीने घेण्यात येत होती. ग्रुप पासिंगच्या नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात नापास झाल्यानंतर, चारही विषय घेऊन परीक्षा द्यावी लागत असे.
एका विषयात नापास झाल्यानंतर, सर्व विषयांत नापास करण्याची पद्धत बंद करावी, अशी मागणी युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य महादेव जगताप यांनी केली होती, तर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांत आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले होते. या संदर्भात त्यांनी विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची विशेष बैठक घेऊन नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील नापास विषयाचीच परीक्षा द्यावी लागेल. आयडॉलचे अनेक विद्यार्थी नोकरी करून शिकत असल्याने, त्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होईल, असे जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)