मुंबई: परीक्षेला बसूनही गैरहजर दाखवून एका विद्यार्थ्याला नापास करण्यात आले. त्याने विद्यापीठाशी संपर्क साधल्यावर हजर असल्याचे पुरावे सादर कर, असे त्याला सांगण्यात आले. हे पुरावे देऊनही अद्याप विद्यार्थ्याला निकाल मिळालेला नाही. आता निकाल मिळायला डिसेंबर महिना उजाडणार असल्याचे कळल्यानंतर, या विद्यार्थ्याला धक्का बसला आहे.मुंबई विद्यापीठात आॅनलाइन मूल्यांकन केल्यामुळे निकालाला लेटमार्क लागला, पण १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात अजूनही शेकडो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल गोंधळ सुरूच आहे. या निकाल गोंधळाबाबत एका विद्यार्थ्याने सांगितले की, मी बीकॉमच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. सप्टेंबर महिन्यातही माझा निकाल जाहीर झाला नाही. त्या वेळी निकाल राखीव ठेवला असेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर, वारंवार पाठपुरावा करूनही निकाल मिळाला नाही. मग एका पेपरला गैरहजर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निकाल जाहीर केला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. हे ऐकून धक्का बसला. त्या वेळी विद्यापीठाकडून परीक्षेला हजर असल्याचे पत्र आणण्यास सांगितले. त्यानंतर, पत्र आणून दिले. गेले दोन महिने सातत्याने विद्यापीठात फेºया मारत आहे, पण अजूनही निकाल हाती लागलेला नाही. आता विद्यापीठाने हजर असल्याचे मान्य केले, पण निकाल हाती मिळण्यास अजून तब्बल २० दिवस लागतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.या विद्यार्थ्याप्रमाणेच आणखी काही विद्यार्थ्यांनीही आपण हजर असूनदेखील गैरहजर दाखवत विद्यापीठाने नापास केल्याचीखंत व्यक्त केली आहे. या संदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
परीक्षेला गैरहजर ठरवत केले नापास, गोंधळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:10 AM