अत्याचारग्रस्तांची तपासणी पालकांच्या उपस्थितीत करा, राज्यातील मेडिकल कॉलेजना सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 07:56 AM2024-09-04T07:56:18+5:302024-09-04T07:56:28+5:30
गेल्या महिनाभरात बालकांच्या लैंगिक छळाच्या अनेक घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत. असे पीडित उपचारासाठी आले तर त्यांच्या तपासणीबाबत कोणते नियम पाळावेत, याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकल कॉलेजला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मुंबई - गेल्या महिनाभरात बालकांच्या लैंगिक छळाच्या अनेक घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत. असे पीडित उपचारासाठी आले तर त्यांच्या तपासणीबाबत कोणते नियम पाळावेत, याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकल कॉलेजला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये मुलाच्या पालकांच्या उपस्थितीत किंवा पीडितेचा ज्या व्यक्तीवर विश्वास आहे, त्याच्या समक्ष ही तपासणी करावी, तसेच पीडित मुलगी असल्यास तिची तपासणी महिला डॉक्टरांकडून करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद पॉक्सो कायद्यांतर्गत होते. याअंतर्गत पीडित मुलांची तपासणी कायद्यात जे नियम आखून दिले आहेत, त्याप्रमाणे करावी. या प्रकरणात आपत्कालीन वैद्यकीय सेवा देताना पीडितेची गोपनीयता ठेवावी. तपासणी दरम्यान काही कारणास्तव मुलाचे पालक उपस्थित राहू शकत नसल्यास रुग्णालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेल्या महिलांच्या उपस्थितीत तपासणी करावी. अशा पीडितेकडून कोणतीही कायदेशीर कागदपत्रे किंवा इतर दस्तऐवजाची मागणी करू नये, अशा विविध मार्गदर्शक सूचनांचा यामध्ये समावेश आहे.