मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घरूनच देता याव्यात, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या परीक्षांना सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.विना परीक्षा पदवी देता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर पडून परीक्षा केंद्रांवर यावे लागू नये, घरातूनच परीक्षा देता याव्यात, यावर कुलगुरूंचे एकमत झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर महिन्यातच परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, आवश्यकता भासल्यास याला मुदतवाढ घेण्ताची मुभा सर्वोच्च न्यायालयाने निकालात दिली आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. अमरावती आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने १० नोव्हेंबर तर उर्वरित सर्व विद्यापीठांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. त्यानुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाईल आणि यूजीसीकडे मुदतवाढ मागितली जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ३१ आॅक्टोबर, २०२० पर्यंत निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवर कोरोना किंवा तांत्रिक अडचणी आल्या, तर त्यांनी निकालाची प्रक्रिया जास्तीतजास्त १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता, विधि व न्याय विभाग, अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू, असेही सामंत यांनी संगितले.२ सप्टेंबरच्या बैठकीनंतर पुढील निर्णयबैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा आॅनलाइन की आॅफलाइन, परीक्षेची तारीख काय असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरूंशी सविस्तर चर्चा करण्यात आली. परीक्षा पद्धतीसंदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवारी, २ सप्टेंबरला होईल. त्यानंतर, पुढील निर्णय घेतले जातील, असेही सामंत म्हणाले.प्राधिकरणाचे अधिकार अबाधित राहणारकुलगुरूंच्या बैठका, अहवाल सादर करणे, परीक्षांविषयी अंतिम निर्णय घेणे या सर्व प्रक्रिया शासनस्तरावर होत असल्या तरी कुलगुरू आणि परीक्षा प्राधिकरणाचे अधिकार हे त्यांच्यास्तरावर अबाधित राहणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने घ्यायची याचा निर्णय हा सर्वस्वी त्या त्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अखत्यारित असेल. प्राधिकरणांच्या समंतीनंतरच त्याप्रकारे परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतिम सत्राच्या परीक्षा घरूनच देता येणार, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 6:57 AM