लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दरवर्षी १५ एप्रिलपर्यंत आटोपणाऱ्या पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा यंदा २५ एप्रिलपर्यंत लांबणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचे नियोजन कोलमडणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षेसंदर्भात एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा याकरिता शासनाने यंदाची परीक्षा ८ ते २५ एप्रिलदरम्यान आयोजित केली असून, यासंदर्भात राज्य शिक्षण उपसंचालक रजनी रावडे यांनी राज्यभरातील संबंधित सर्व विभागांना सूचना जारी केली आहे. एप्रिलच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या, तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. त्या पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्ष अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी कमी कालावधी मिळतो. म्हणूनच या वर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी ८ ते २५ एप्रिलदरम्यान घेतल्या जाणार आहेत, असे शासनाच्या पत्रात नमूद आहे.
सर्व विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा. म्हणून यंदा परीक्षांचे नियोजन ८ एप्रिल ते २५ एप्रिल असे केले आहे. शिक्षकांना परीक्षा सरावासाठी वेळ मिळेल. - सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे
यंदाच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन समजण्यापलीकडे आहे. गावी जाणाऱ्या पालक आणि शिक्षकांनी बहुतांशी रेल्वे, बस गाड्यांचे आरक्षण १५ एप्रिलपासून केले. त्यांची यामुळे अडचण झाल्याचे शिक्षक व पालकांचे म्हणणे आहे. - विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती