गुरुजींच्या गुरुजींसाठी परीक्षा; तीन हजार जागा भरणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 03:18 PM2023-06-12T15:18:14+5:302023-06-12T15:18:28+5:30
केंद्रप्रमुख निवडीचा मार्ग झाला मोकळा, शिक्षकांकडून समाधान व्यक्त
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिक्षण विभागामध्ये शिक्षक व प्रशासन यांना जोडणारा दुवा म्हणून काम पाहणाऱ्या व गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या केंद्रप्रमुख निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये २ हजार ३८४ केंद्रप्रमुखांच्या जागा भरल्या जाणार आहेत, यामुळे शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिक्षकांनाही केंद्रप्रमुख होण्याची संधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ५ जून रोजी प्रसिद्धी निवेदन देत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले. यासाठी ६ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, महिन्याच्या अखेर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे आता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना देखील स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळणार आहे
अशी असेल परीक्षा
केंद्रप्रमुख होण्यासाठी पात्र शिक्षकांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. २०० गुणांची परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे, तर या २०० गुणांमध्ये दोन विभाग असून, पहिल्या विभागात बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता हा घटक असेल. दुसऱ्या विभागात शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह याविषयीचा अभ्यासक्रम असणार आहे.
अशी आहे पात्रता
अर्ज करण्यास ५० वर्षे वयाची अट घातल्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार आहेत, तर ५० वर्षांवरील शिक्षकांनाही परीक्षेची संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.
केंद्रप्रमुखांचे काम काय?
केंद्रप्रमुख हा प्रशासन व शिक्षकांमधील दुवा असतो. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या अंतर्गत १५ ते २० शाळा येतात. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात. केंद्रप्रमुखांच्या जागा स्पर्धा परीक्षेतून भरण्यात येणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त जागांमुळे भेडसावणारा प्रश्न मार्गी लागणार आहे. या निर्णयामुळे मोकळा झाल्याने सेवेत असलेल्या केंद्रप्रमुखांच्या कामावरील ताण कमी होणार आहे.