मुंबई : मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला आता २२ मार्चनंतर सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण आता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने ऐन परीक्षेच्या हंगामात पूल बंद केला तर विद्यार्थ्यांसोबत सर्वांची गैरसोय होईल. परिणामी २२ मार्चपर्यंत हा पूल बंद करण्यात येऊ नये, अशी विनंती वाहतूक पोलिसांनी मध्य रेल्वेला केली आहे. त्यामुळे सायन रेल्वे पुलाचे पाडकाम आता पुन्हा लांबणीवर पडले आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून पूल बंद केला जाणार होता. त्यानंतर पुलाचे पाडकाम हाती घेतले जाणार होते. सध्या परीक्षांचा हंगाम असून, सायन, माटुंगा, कुर्ला व लगतच्या परिसरात शाळा असून, परीक्षा केंद्र आहेत. परिणामी परीक्षा काळात हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी सातत्याने स्थानिकांकडून केली जात होती. खासदार राहुल शेवाळे आणि बैठकीत सायन रेल्वे पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्याबाबत निर्णय झाला होता. वाहतूक पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर २२ मार्चनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल.
१) सायन रेल्वे पूल ब्रिटिशकालीन आहे. १९१२ साली बांधण्यात आला आहे.
२) मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी हा पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे.
३) २४ महिन्यात नवीन पूल बांधून पूर्ण केला जाईल.
४) महापालिका आणि रेल्वे एकत्रित यासाठी खर्च करेल.