Join us

महापालिकेच्या दिरंगाईमुळे गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर खोदकाम व पुनर्भरणाचं काम रखडलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 8:47 PM

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरेगाव प्रवासी संघाने या विषयी प्रभाग क्रमांक 52 च्या स्थानिक नगरसेविका  प्रिती सातम यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.

ठळक मुद्देयाबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरेगाव प्रवासी संघाने या विषयी प्रभाग क्रमांक 52 च्या स्थानिक नगरसेविका  प्रिती सातम यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गोरेगाव पूर्व येथील महामार्गावर २०१९ च्या अखेरीस अदानी इलेक्ट्रीक कंपनीने नवीन केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते. दुरुस्ती पश्चात कामातील काही त्रुटी मुळे रस्ता खचला व जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले व परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागला होता. मात्र पालिकेच्या दिरंगाईमुळे खोदकाम व पुनर्भरणाचे काम रखडले असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबतीत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच रस्ता खोदण्याची परवानगी मिळेल व काम सुरू करण्यात येईल याची दक्षता पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी घ्यावी अशी मागणी गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरेगाव प्रवासी संघाने या विषयी प्रभाग क्रमांक 52 च्या स्थानिक नगरसेविका  प्रिती सातम यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. गो.प्र. संघाचे कार्यकारीणी सदस्य राजन सावे यांनी तांत्रिक बाबी सखोल अभ्यासून लॉकडाऊन पश्चात गेल्या नोव्हेंबर २०२० मध्ये महामार्गावर झालेल्या चर्चेत हा विषय अदानी अभियंते,मनपा ,एमएमआर डिएच्या अभियंत्यां  समोर नगरसेविका सातम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा मांडला. पाईपलाईनला कॉंक्रीटचा नीट आधार न दिल्याने पुन्हा पाईप लाईन फुटून होणाऱ्या परिणामांमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागेल असे अधोरेखित केले होते.

नगरसेविका सातम व गोरेगाव प्रवासी संघाचे राजन सावे यांचे म्हणणे मान्य करून संबंधितांना हे काम डिसेंबरमध्ये करण्याची तयारी संबंधित सर्व यंत्रणांनी दाखवली. अदानी कंपनीने पुढाकार घेऊन  साडेपाच लाख रुपयांच्या रकमेचा धनाकर्ष काढून मनपाकडे सादर केला. मात्र सदर कामाची परवानगी एमएमआरडीए कडून घेतलेली नाही व आज सुद्धा पालिकेची सॅप प्रणाली बंद असल्याच्या कारणास्तव सदर धनाकर्ष मनपाकडे जमा होऊ शकला नाही अशी माहिती उदय चितळे यांनी लोकमतला दिली.

या खोदकाम व पुनर्भरणाचे काम करण्याचा परवानगी साठीचा अर्ज मनपाने एमएमआरडीए कडे करणे आवश्यक आहे असा निष्कर्ष डिसेंबरमध्ये झालेल्या विविध पत्रोत्तर व गाठीभेटीतून निघाला अशी माहिती त्यांनी दिली. कारण तिन्ही यंत्रणांनी केलेली दप्तर दिरंगाई नागरी हिताला मारक आहे. नागरी हिताकरीता कटिबद्ध  असल्याने गोरेगाव प्रवासी संघातर्फे आजच परवानगी साठीचे पी दक्षिण विभागाचे सहाय्यक अभियंता यांना पत्र देण्याची विनंती केली आहे. सदर कामापश्चात पुनर्भरणणी कामासाठी लागणारा खर्च देण्यास अदानी कंपनी तयार आहे असे चितळे यांनी नमूद केले. 

टॅग्स :मुंबई