गोरेगावचा पश्चिम द्रुतगती महामार्ग : नागरिकांना होतोय नाहक त्रास
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील महामार्गावर २०१९च्या अखेरीस अदानी इलेक्ट्रिक कंपनीने नवीन केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते. दुरुस्तीपश्चात कामातील काही त्रुटींमुळे रस्ता खचला व जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले. मात्र पालिकेच्या दिरंगाईमुळे खोदकाम व पुनर्भरणाचे काम रखडले असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबतीत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच रस्ता खोदण्याची परवानगी मिळेल व काम सुरू करण्यात येईल, याची दक्षता पी दक्षिण विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांनी घ्यावी, अशी मागणी गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी केली आहे.
गोरेगाव प्रवासी संघाने याविषयी प्रभाग क्रमांक ५२ च्या स्थानिक नगरसेविका प्रीती सातम यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. संघाचे कार्यकारिणी सदस्य राजन सावे यांनी तांत्रिक बाबी सखोल अभ्यासून लॉकडाऊनपश्चात गेल्या नोव्हेंबर २०२० मध्ये महामार्गावर झालेल्या चर्चेत हा विषय अदानी अभियंते, मनपा, एमएमआरडीएच्या अभियंत्यांसमोर नगरसेविका सातम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा मांडला. पाइपलाइनला काँक्रिटचा नीट आधार न दिल्याने पुन्हा पाइपलाइन फुटून होणाऱ्या परिणामांमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागेल, असे अधोरेखित केले होते.
नगरसेविका सातम व गोरेगाव प्रवासी संघाचे राजन सावे यांचे म्हणणे मान्य करून संबंधितांना हे काम डिसेंबरमध्ये करण्याची तयारी संबंधित सर्व यंत्रणांनी दाखवली. अदानी कंपनीने पुढाकार घेऊन साडेपाच लाख रुपयांच्या रकमेचा धनाकर्ष काढून मनपाकडे सादर केला. मात्र सदर कामाची परवानगी एमएमआरडीएकडून घेतलेली नाही व आजसुद्धा पालिकेची सॅप प्रणाली बंद असल्याच्या कारणास्तव सदर धनाकर्ष मनपाकडे जमा होऊ शकला नाही, अशी माहिती उदय चितळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
या खोदकाम व पुनर्भरणाचे काम करण्याच्या परवानगीसाठीचा अर्ज मनपाने एमएमआरडीएकडे करणे आवश्यक आहे, असा निष्कर्ष डिसेंबरमध्ये झालेल्या विविध पत्रोत्तर व गाठीभेटींतून निघाला, अशी माहिती त्यांनी दिली.
-----------------------------------