बाणगंगा तलावाजवळील खोदकामामुळे पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:21+5:302021-01-03T04:08:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बाणगंगा तलावालगत खासगी विकासकाकडून खोदकाम केले जात आहे. बाणगंगेचा जलस्रोत दूषित होत असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बाणगंगा तलावालगत खासगी विकासकाकडून खोदकाम केले जात आहे. बाणगंगेचा जलस्रोत दूषित होत असल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत संबंधित विकासकाने भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल महापालिकेला सादर करेपर्यंत सदर काम बंद ठेवण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सप्टेंबर २०२० पासून बाणगंगा कुंडाजवळ इमारत बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामाला सुरुवात झाल्यानंतर बाणगंगेमध्ये येणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतातून चिखल आणि चिखलमिश्रित पाणी कुंडामध्ये यायला लागले. यामुळे भूमिगत जलस्रोताला बाधा निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. भविष्यात हे बांधकाम तसेच कुंडाच्या आजूबाजूला अन्य खोदकाम झाल्यास हा ऐतिहासिक जलस्रोत लुप्त होण्याची भीती हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे महापौर यांच्याकडे व्यक्त केली होती.
या निवेदनानुसार महापौरांनी नुकतीच बाणगंगा तलाव परिसराची पाहणी केली. या वेळी डी विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामाचा आढावा घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्याची सूचना महापौरांनी केली. बाणगंगेचा ऐतिहासिक ठेवा पुसू नये, नैसर्गिक स्रोत जिवंत राहावा यासाठी संबंधित ठेकेदाराला तातडीने काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश द्यावेत, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना बजावले.
रात्रीचे काम केल्यास कारवाई
संबंधित विकासकाला भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतर नैसर्गिक स्रोत जिवंत ठेवून याबाबत निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र विकासक रात्रीच्या वेळेस काम करीत असल्यास महापालिका कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.