Join us

महापरिनिर्वाणदिनी उत्कृष्ट सुविधा

By admin | Published: November 10, 2015 2:16 AM

महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा

मुंबई : महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना पालिका प्रशासनातर्फे पुरविण्यात येतात. या वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उत्कृष्ट दर्जाच्या विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येतील. तसेच गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आणखी वाढीव नागरी सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले.महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, वडाळा महाविद्यालय येथे पुरविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधांबाबतची आढावा बैठक पल्लवी दराडे यांच्या अध्यक्षतेखाली जी/उत्तर विभाग कार्यालय येथे झाली. या बैठकीत उपायुक्त आनंद वागराळकर, पोलीस उप-आयुक्त डॉ. पंजाब उगले, जी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर, साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे, साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, भदन्त राहुल मित्र तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे पदाधिकारी व इतर संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.पल्लवी दराडे म्हणाल्या की, शिवाजी पार्क, चैत्यभूमीकडे येणारा परिसर तसेच शिवाजी पार्क मैदान येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांचा दर्जा उत्कृष्ट करण्यात येईल. तसेच बैठकीत विविध संस्थांकडून आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. याबाबतीत पालिकेच्या सर्व संबंधित खात्यांना या बैठकीत विविध संस्थांकडून आलेल्या सूचनांबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)