ठाणे : राजस्थानी वस्तू-पदार्थांचे स्टॉल्स, राजस्थानी संगीतावर आधारित रंगारंग कार्यक्रम आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद, अशा उत्साही वातावरणात रंगलेल्या राजस्थान महोत्सवाचे शानदार उद्घाटन शनिवारी सायंकाळी ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ तथा माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअरच्या वतीने शिवाजी मैदान येथे हा महोत्सव आयोजिला होता. या वेळी आयोजिका सुमन अग्रवाल यांनी दर्डा यांचा राजस्थानी पगडी, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. राजस्थानच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महोत्सव एक महिला स्वत:च्या हिमतीवर गेली तीन वर्षे उत्कृष्टरीत्या आयोजित करीत आहे, अशा शब्दांत दर्डा यांनी सुमन यांचा गौरव केला. महोत्सवाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण हा उपक्रम राबविण्याचा निर्णय योग्य असून जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.उद्योजक दिनेश अग्रवाल, आमदार गोपालदास अग्रवाल, ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज शिंदे, जैन मानव सेवा केंद्र दहिसरचे व्यवस्थापक डॉ. नेमजी गांगर, ओसवाल यूथ फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष किशोर खाबिया, मोहन तिवारी आदी उपस्थित होते. या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महोत्सवाच्या प्रारंभीच सालासर हनुमानाचे पूजन करण्यात आले. तसेच विविध स्टॉल्सना मान्यवरांनी भेट दिली. त्यानंतर गायक, संगीतकार सतीश देहरा आणि ग्रुपने मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. या महोत्सवाला जिल्ह्यातील राजस्थानी समाजाबरोबरच इतरही समाजाने भरभरून प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)
राजस्थान महोत्सवाचे शानदार उदघाटन
By admin | Published: January 04, 2015 11:03 PM