मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो -३ प्रकल्पासाठी दर्जात्मक काम करण्याचा एमएमआरसीए प्रयत्न करत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात हा भुयारी प्रकल्प आहे, त्यामुळे एमएमआरसीएने या प्रकल्पाच्या कामात विशेष लक्ष घातले आहे.मेट्रो ३ साठी सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल प्लॅटफॉर्म, स्क्रीन डोअर्स, टेलिकम्युनिकेशन प्रणाली आणि ई-स्काडा पद्धती या प्रणालींचे एकत्रित कंत्राट सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रदान केले आहे. यानुसार अल्स्टोम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड आणि अल्स्टोम ट्रान्सपोर्ट एसए फ्रांस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संयुक्त कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल प्रणाली आंतरराष्ट्रीय दर्जाची सीबीटीसी तंत्रज्ञान, स्वयंचलित ट्रेन प्रणाली, सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स पद्धती, प्रवाशांच्या माहितीसाठी सुसज्ज टेलिकम्युनिकेशन प्रणाली, दिशादर्शक माहितीपट, प्रवाशांसाठी सूचना, सीसीटीव्ही कव्हरेज, आपत्कालीन मदत प्रणाली, तसेच बिनतारी ध्वनी प्रणाली, स्थानकांच्या अचूक नियंत्रणासाठी एम आणि ई स्काडा पद्धती यांचा समावेश आहे़>कोणतीही तडजोड नाहीयाप्रसंगी बोलताना एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यादृष्टीने पॅकेज १२ ची ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स, टेलिकम्युनिकेशन प्रणाली, एम आणि ई स्काडा पद्धती यांची नियुक्ती विहित प्रक्रिया अवलंबून केली असून, दर्जात्मक दृष्टीने कोणतीही तडजोड केलेली नाही. मुंबई मेट्रो ३ वेळेत पूर्ण करून नागरिकांना ही आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
मेट्रो-३ प्रकल्पात करणार दर्जेदार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:33 PM