किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण !
By मनीषा म्हात्रे | Published: May 21, 2024 02:10 PM2024-05-21T14:10:47+5:302024-05-21T14:12:12+5:30
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मुंबईत मतदानाला गालबोट लागले नाही. काही ठिकाणी झालेले किरकोळ वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. शहरात शांततेत मतदान पार पडल्याचे मुंबई पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
मुंबईत सोमवारी झालेल्या मतदानावेळी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांसह दोन हजार ७५२ पोलिस अधिकारी आणि २७ हजार ४६० पोलिस अंमलदार मतदान केंद्रांसह संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी तैनात होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेत दंगल नियंत्रण पथके आणि केंद्रीय सुरक्षा दलाची पथके तैनात केली होती.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही समाज माध्यमांद्वारे प्रचार केल्याच्या आरोपाखाली डीएननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालाड पूर्व येथील कुरार आप्पा पाडा
परिसरात अंजली पाष्टे (५३) या महिलेला दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात
आले. याप्रकरणी महिलेला सीआरपीसी कलम ४१(१) (अ) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.
कोणताही
गंभीर गुन्हा नाही...
कोणताही गंभीर गुन्हा किंवा हिंसा नाही. आचारसंहिता उल्लंघनाच्या काही तक्रारी आणि इतर घटना वगळता, पूर्णपणे शांततापूर्ण वातावरण निवडणूक पार पडली.
- सत्यनारायण चौधरी,
सह पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था
हाच खरा आनंद : आयुक्त
मतदान करून देशाप्रती आपले कर्तव्य निभावणे, हाच खरा आनंद. देशासाठी माझे कर्तव्य बजावून दिवसाची सुरुवात केल्याचे मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले.
सुनील राऊत पोलिसांच्या गाडीसमोर
- कांजूर मार्ग परिसरात पालिका मतदान केंद्रात शिवसेनेचे कार्यकर्ते डमी पुठ्ठ्याची व्होटिंग मशीन घेऊन बसले. यावेळी पोलिसांनी आक्षेप घेत दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. हे समजताच, सुनील राऊत यांनी पोलिसांकडे जाब विचारत कारवाई करण्यास विरोध केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
- कार्यकर्त्यांना पोलिस घेऊन जात असताना सुनील राऊत हे गाडीसमोर उभे राहिले. अखेर, कार्यकर्त्यांना सोडत असल्याचे सांगताच त्यांनी माघार घेतली. कांजूर पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. तर मतदान करण्यासाठी धमकावले जात असल्याच्या आरोपांवरुन भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.