आॅक्टोबर हीटचा तडाखा मान्सून परतल्याने प्रकर्षाने जाणवणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 07:01 AM2018-09-30T07:01:51+5:302018-10-01T06:50:40+5:30
राज्यावर दुष्काळाचे संकट : पावसाळ्यात फक्त नऊ दिवस पडला मुसळधार
मुंबई : जून, जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हात आखडता घेतला. परिणामी, राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईतही जून आणि जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात माघार घेतली. पावसाळाच्या चार महिन्यांचा आढावा घेतला असता सांताक्रुझ वेधशाळेत नऊ दिवस तर कुलाबा वेधशाळेत सात दिवस मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मान्सून राजस्थान, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांतून माघारी परतल्याची घोषणाही भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारी केली आहे. परिणामी, आता मुंबईकरांना आणखी आॅक्टोबर हिटला सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ३ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील. पुणे आणि आसपासच्या परिसरात ५ आॅक्टोबरपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहील. मुंबई शहर आणि उपनगरात रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरात सायंकाळी/रात्री मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुसळधार पावसाचे दिवस
वर्ष जुन जुलै आॅगस्ट सप्टेंबर
२००९ १ ३ १ १
२०१० ३ ७ ६ १
२०११ २ १० ६ ०
२०१२ ० ४ ० २
२०१३ ७ ४ १ ०
२०१४ ० ७ १ १
२०१५ ६ ० ० ०
२०१६ ५ ६ २ ४
२०१७ २ ६ ४ २
२०१८ २ ७ ० ०