Join us

जास्तीचे पाणी शरीराला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:08 AM

मुंबई : अनेकदा आपल्याला अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो; पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू ...

मुंबई : अनेकदा आपल्याला अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो; पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. जसे कमी पाणी पिणे धोकादायक असते, तसे अधिक प्रमाणात पाणी पिणेही धोकादायक असते.

शरीरात अधिक प्रमाणात पाणी घेण्यात आले आणि जर ते बाहेर काढण्याचे तंत्र बंद असेल तर शरीरात पाणी साठू शकते. साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराला हानी होऊ शकते. निरोगी शरीरासाठी दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी पुरेसे आहे. शारीरिक काम करणाऱ्यांसाठी अधिक प्रमाणात द्रव शरीरात घ्यावे लागते. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिणे आदर्श मानले जाते. व्यक्तीची उंची, वजन, व्यायामाची पद्धत यावरून पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

मूत्रपिंड शरीरातील सर्व पाणी बाहेर टाकण्यास सक्षम नसते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचा ताळमेळ बिघडू लागतो आणि अधिकचे पाणी शरीरात साठू लागते. शरीराचे वजन वाढत जाते. शरीरात जास्त प्रमाणात घेतलेले पाणी रक्तदाबात गतीने मिसळू शकते.

रक्तातील तरल पदार्थ पातळ होण्याचा धोका संभवतो, अशी माहिती यूरोलोजिस्ट डॉ. शशांक गुप्ता यांनी दिली आहे. पाण्याच्या पातळीत होणाऱ्या वाढीमुळे शरीरातील कोशिका सुकू लागतात. शरीरावर सूज येऊन अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. जास्तीचे सोडियम आणि कमी प्रमाणात पोटॅशियमच्या सेवनामुळे जास्त तहान लागते. जास्त प्रमाणात मीठ खात असल्यास शरीर जास्तीच्या पाण्याची मागणी करते. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सेल्समधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असते, असेही डॉक्टरांनी नमूद केले

जास्त पाणी पिल्याने ओव्हर-हायड्रेशन होते. यामुळे उलटी होणे, डोकेदुखी, मानसिक स्थिती बिघडणे उदा. भ्रम किंवा विचलन अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ओव्हर-हायड्रेशनचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो, मूत्रपिंड पाणी फिल्टर करत असते. जास्त पाणी पिल्याने मूत्रपिंडावर जास्तीचा भार पडतो. मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका संभवतो.