मुंबई : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे वाशी परिमंडळांतर्गत २०० के. व्ही. महाड उपकेंद्र येथे पडलेल्या अति उच्च दाबाच्या वाहिनीचे मनोरे महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने पूर्ववत केले आहेत. वेळेत हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अति उच्च दाब संचलन व सुव्यवस्था विभाग, महाड अंतर्गत २०० के. व्ही. कांदळगाव उपकेंद्र व २०० के. व्ही. महाड उपकेंद्र येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे २२ जुलै रोजी अति उच्च दाब वाहिनीचा मनोरा क्रमांक ९ व १० पडल्यामुळे महाड पोलादपूर तालुक्यातील औद्योगिक घरगुती वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच पुराच्या पाण्यामुळे २२० के. व्ही. महाड उपकेंद्रातील महत्त्वाची उपकरणे निकामी झाली होती.
वीजपुरवठा तात्काळ सुरू होण्याच्या दृष्टीने महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य ती पाहणी करून योजनाबद्ध पद्धतीने मनोरे पूर्ववत केले. उपकेंद्रातील निकामी झालेल्या उपकरणाच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केली. वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री अदिती तटकरे व रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासमवेत महापारेषणचे संचालक संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक श्रीकांत राजूरकर, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील यांनी प्रत्यक्ष कामामध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता मनोज जोशी, अधीक्षक अभियंता मोरेश्वर ढोरे, अधीक्षक अभियंता अनिल भारसाखळे, कार्यकारी अभियंता संजय काटकर, अंकुश जगताप, किशोर गरूड, गिरीश माळोदे, रवींद्र नगरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता युवराज बागडे, धीरज पाटील, सचिन कदम, रियाज मुजावर, उपकार्यकारी अभियंता स्वामी दासारी, कपिल गलगलीकर उपस्थित होते.