मुंबई – महापालिकेच्या सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबई महापालिकेने या प्रकरणात चूक कबूल करत शवगृहातील २ कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही महापालिकेने म्हटलं आहे.
रस्ते अपघातात जखमी होऊन शनिवारी रात्री मृत पावलेल्या अंकुश सुरवडे या २६ वर्षीय तरूणाचा मृतदेह रुग्णालयाने भलत्याच लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. तसंच अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आणि रुग्णाची किडणी काढल्याचा आरोपही नातेवाईकांनी रुग्णालयावर केला.
याबाबत मुंबई महापालिकेने म्हटलं आहे की, मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप सर्वस्वी चुकीचा असून प्रशासन तो स्पष्टपणे नाकारत आहे. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) यांना दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने उपचारार्थ आलेल्या अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येते होते. दुर्दैवाने अंकुश यांचं १३ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. विहित प्रक्रियेनुसार त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.
त्याचवेळी शीव रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, १२ सप्टेंबर २०२० रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी रविवारी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात राखण्यात आले होते. अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी काल सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून कळवले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील.
सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; अंत्यसंस्कारही झाल्यानं नातेवाईक संतप्त
या कालावधीत, हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून, सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सोपवण्यात आले. हेमंत यांच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले. त्यानंतर, अंकुश यांचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. पोलीस प्रशासनही रुग्णालयात आले. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मृतदेह अदलाबदल होण्याचा प्रकार हा दुर्दैवी असून त्याचे कोणत्याही प्रकारे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करत नाही. घडलेल्या चुकीबाबत प्रशासन दिलगीर आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच या घटनेतील चुकीबद्दल, शवागारातील संबंधित दोन कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल. तथापि, शवविच्छेदन करताना मयतांचे मूत्रपिंड (किडनी) करण्यात आल्याचा आरोप मात्र अयोग्य असून हा आरोप प्रशासन नाकारत आहे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.