मतदारांमध्ये खळबळ... मतदार नोंदणी अधिकाऱ्याचा मतदारांना अजब फतवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:11 AM2021-10-22T00:11:42+5:302021-10-22T00:12:14+5:30
वर्सोवा विधानसभा मतदार संघात माजली खळबळ
मुंबई - १६४ वर्सोवा विधानसभेत मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या अजब फतव्याने खळबळ माजली आहे. उपविभाग प्रमुख राजेश शेट्ये व शाखा क्र ६० चे शाखाप्रमुख सिध्देश चाचे यांचे फोन खणखणू लागले ते विभागातील मतदारांना मतदार नोंदणी अधिकारी एस. डी. माळी यांच्या सही शिक्क्यासह आलेल्या खळबळजनक पत्राची तक्रार करण्यासंबंधी. विशेष म्हणजे सुंदरवनमध्ये राहणारे जेष्ठ पत्रकार अजय वैद्य यांनासुद्धा या निवडणूक अधिकाऱ्याने नोटीस पाठवली.
जून २०२१ पासून निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नाहीत त्या मतदारांना ते तिथे राहत नाहीत, असे गृहित धरून संबंधित मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल अशी नोटीस घेऊन आयोगाचे बीएलओ घराघरात गेले होते. संबंधित फोटो नसलेला मतदार रहातो याची खात्री करून घेऊन व त्याचे फोटो सोबत घेऊन ते नोंदणी कार्यालयात रितसर जमा केले. आता, ४ महिन्याने त्याच मतदारांना वर नमूद केलेल्या अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यासह नावे वगळण्याची नोटीस रजिस्टर पोस्टाने बजावण्यात आली असून हजारो मतदारांना नोटीस पाठवल्याचे कळते.
उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी या नोटिसीला त्वरित आक्षेप घेतला आहे. तसेच पत्रामधील संबधीत ईमेलवर हा आक्षेप नोंदवलादेखील आहे. यात सरकारचे हजारो रूपये खर्च करून आयोगानेच नेमलेल्या बीएलओने मोठ्या श्रमाने गोळा केलेल्या माहितीवर त्याच आयोगाने निरर्थक शंका उपस्थित केली आहे. आयोगाने त्यांना श्रमदान करण्यासाठीचा खटाटोप का केला? पत्रच पाठवून खातरजमा करायची होती तर ४ महिने कश्यासाठी वाया घालवले.? असा सवाल शेट्ये यांनी केला आहे.