उत्कंठा, चिंता, टाळ्या आणि शिट्ट्या...; यशवंतराव चव्हाण केंद्रात उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 01:06 PM2023-08-15T13:06:12+5:302023-08-15T13:07:14+5:30

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरचे सभागृह भरून गेले होते; निमित्त होते ते ‘म्हाडा’च्या लॉटरीचे.

excitement applause and whistle at the yashwantrao chavan centre in mhada lottery | उत्कंठा, चिंता, टाळ्या आणि शिट्ट्या...; यशवंतराव चव्हाण केंद्रात उत्साह

उत्कंठा, चिंता, टाळ्या आणि शिट्ट्या...; यशवंतराव चव्हाण केंद्रात उत्साह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे प्रसंग, अंगावर उभे राहणारे काटे, समोर असलेल्या स्क्रीनवर जाहीर होणारी विजेत्यांची नावे, आपल्याला कधी घर लागेल? या आशेने व्यासपीठाकडे लागलेले डोळे आणि विजेत्यांची नावे जाहीर होत असताना प्रेक्षकांमधून होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि वाजणाऱ्या शिट्ट्या... अशा काहीशा उत्साही आणि आनंदमय वातावरणाने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरचे सभागृह भरून गेले होते; निमित्त होते ते ‘म्हाडा’च्या लॉटरीचे.

म्हाडा’च्या वतीने अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी सभागृहात आणि सभागृहाबाहेर अर्जदारांची तुफान गर्दी झाली होती. ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष लॉटरी पाहणे शक्य होते अशांनी सभागृहात आवर्जून हजेरी लावली होती. ज्यांना प्रत्यक्ष लॉटरी पाहणे शक्य नव्हते अशांनी लॉटरीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यावर भर दिला.

‘म्हाडा’च्या लॉटरीचा कार्यक्रम सुरू झाला आणि दुपारपासूनच सभागृहासह सभागृहाबाहेर अर्जदारांची गर्दी होऊ लागली. सभागृहात लागलेली स्क्रीन व्यवस्थित दिसावेत, यासाठी अर्जदारांनी मोक्याची सीट पटकाविली होती. आपल्याला घर लागणार का?  या एका प्रश्नाने अर्जदारांची चेहरे चिंतेत पडले होते.

फुलांची आरास

सभागृहाच्या व्यासपीठासह सभागृहात ठिकठिकाणी फुलांची आरास केली होती. सुंदर अशा मनमोहक रंगीबेरंगी फुलांनी सभागृहाचे सौंदर्य खुलले होते.

महाराष्ट्र गीत 

‘म्हाडा’च्या लॉटरीची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी गीताच्या सुराला सूर देत लॉटरीची भव्य अशी सुरुवात केली.

रांगोळी

सेंटरच्या प्रवेशद्वारापासून व्यासपीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आलेल्या रांगोळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जिन्यांसह सभागृहाबाहेर काढण्यात आलेली रंगबेरंगी रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधत होती.

मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून लॉटरीला सुरुवात केली आणि समोर असलेल्या स्क्रीनवर विजेत्यांच्या नावांसह फोटो झळकले. विजेत्यांना नाव जाहीर होताच ‘एसएमएस’ येतील, असे ‘म्हाडा’कडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र सभागृहात नेटवर्क नसल्याने विजेत्यांना मेसेज येत नव्हते. त्यामुळे विजेते सभागृहात आहेत की नाही? याचा पत्ता लागत नव्हता.

मला घर लागले का?

सेंटरच्या बाहेरील परिसरात अर्जदारांसाठी निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बाहेरच्या तंबूत अर्जदारांनी गर्दी केली होती. समोर असलेल्या स्क्रीनवर विजेत्यांची नावे घोषित होत असतानाच आपल्याला घर लागले का? यासाठी नावांची शोधाशोध सुरू असल्याचे चित्र होते.

सभागृह रिकामे

लॉटरीचा निकाल ऑनलाइन दिसत असल्यामुळे कालांतराने सभागृह रिकामे होऊ लागले होते. दाखल झालेले विजेते सोडले तर चारनंतर सभागृहात विजेते अर्जदार सोडले तर कोणीच नव्हते. त्यामुळे सभागृह रिकामे झाले होते.

नेटवर्क नाही, मग विजेता कसा माहिती पडणार? 

व्यासपीठावरून तशी विचारणा करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांनी नेटवर्क नसल्याचे सांगितले आणि सभागृहात हशा पिकला होता.

चेहऱ्यावर नाराजी 

बहुतांश अर्जदारांना घर लागले नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. मात्र, हताश बसलेल्या अर्जदारांना आता दुसऱ्या लॉटरीसाठी अर्ज करा, असे आवाहन ‘म्हाडा’कडून केले जात होते. सोपी व सुलभ लॉटरी नवीन संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात आली. ही सर्व प्रक्रिया सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

Web Title: excitement applause and whistle at the yashwantrao chavan centre in mhada lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा