Join us

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या कॉलने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:06 AM

नागपूरमधील तरुणाचा खाेडसाळपणा; मनाेरुग्ण असल्याचे उघड, तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात ...

नागपूरमधील तरुणाचा खाेडसाळपणा; मनाेरुग्ण असल्याचे उघड, तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या कॉलने रविवारी दुपारी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. ताे मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पावणेएकच्या सुमारास मंत्रालयातील कंट्रोल रूमला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. या कॉलची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. खबरदारी म्हणून मंत्रालयाचे सर्व गेट बंद करण्यात आले. संपूर्ण परिसराची व इमारतीची कसून तपासणी केली. रविवार असल्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी होती, तसेच कोरोनाच्या नियामवलीमुळेही कर्मचाऱ्यांची कमीच उपस्थिती असते.

दरम्यान, संपूर्ण मंत्रालय परिसर पिंजून काढण्यात आला. प्राथमिक तपासणीत, आक्षेपार्ह असे काहीच सापडले नाही. त्यामुळे हा हॉक्स कॉल असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासाअंती ताे नागपूरमधील तरुणाने केल्याचे उघडकीस आले.

* ‘त्या’ तरुणाला नागपूरमधून अटक

बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या तरुणाला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. चौकशीत तो हॉक्स कॉल असल्याचे (चुकीची माहिती देऊन त्रास देणे, खाेडसाळपणा करणे) उघडकीस आले आहे. तरुण मनोरुग्ण असल्याचेही समोर आले आहे. तरुणाचा जबाब नोंदविण्यात येत असून, अधिक तपास सुरू आहे.

------------------------------------

......................................................