लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेने निवडणुकीत ५०० फुटांच्या घराला करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ५०० फुटांच्या आतील घरांना २०१९ आणि २०२०चा भरवा असे परिपत्रक काढले आहे. ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्यात यावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत दिला आहे.
आपच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रीती शर्मा मेमन म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी असे परिपत्रक काढले की, मुंबई शहरामध्ये पाचशे स्क्वेअर फूटच्या आतील घरांना मालमत्ता कर हा २०१९ आणि २०२० याचा एकत्रितपणे भरावा लागेल.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता करापासून वगळण्याचे आश्वासन दिले होते, असे असतानासुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताने अशा प्रकारचे परिपत्रक जारी केले आहे. ही एक प्रकारची सर्वसामान्य माणसांची दिशाभूल आहे. ५०० फुटांपर्यंतच्या घराना मालमत्ता करातून वगळण्यात यावे. अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही मुंबईमध्ये मालमत्ताकर भरू नये अशा प्रकारचे आंदोलन करू असे त्या म्हणाल्या.
यावेळी आम आदमी पार्टीचे नेते विजेंद्र तिवारी, आम आदमी पार्टी सरचिटणीस सुमित्रा श्रीवास्तव उपस्थित होत्या.