Ashish Shelar Exclusive Interview: भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेली मैत्री जगजाहीर आहे. 'कृष्णकुंज'वर आशिष शेलारांना राज ठाकरे अनेकदा भेटीसाठी बोलावल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येतात. राज ठाकरेंसोबतच्या याच मैत्रिच्या नात्याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी खास 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत एक भावनिक किस्सा कथन केला.
"राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीचं श्रेय हे पूर्णपणे राज ठाकरे यांना जातं. कारण मला आजही वाटतं की राज ठाकरेंकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. विद्यार्थी क्षेत्रात काम करताना आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. मी एक साधा चळवळीतला कार्यकर्ता होतो. त्यानंतर जसे जसे आम्ही काळानुरूप प्रगती करत गेलो. त्यानंतर संवाद वाढला आणि त्या संवादातून मैत्रीचं नातं बनलं पाहिजे. ते बनवलं आणि स्वीकारलं ते राज ठाकरेंमुळेच. पुढे मैत्रीचं नातं आणखी वाढलं. मी आजही त्यांच्याकडून बरंच काही शिकतो", असं आशिष शेलार म्हणाले. 'लोकमत'चे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या 'फेस-टू-फेस' या कार्यक्रमात ते बोलत होते.
शेलारांनी सांगितला 'तो' भावनिक किस्साराज ठाकरेंसोबतच्या स्नेहाबाबत अधिक बोलताना आशिष शेलार यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग यावेळी सांगितला. "मी मुद्दाम यावेळी उल्लेख करेन की माझी आई जेव्हा गेली त्यावेळी राज ठाकरे अर्धा-पाऊण तास खाली उन्हात माझ्यासाठी थांबले होते. मला तुलना करायची नाही किंवा काही अर्थही काढायचा नाही. पण मी हेही विसरू शकणार नाही की त्यावेळेला पुढच्या आठवड्याभराच्या कालावधीत माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रंगशारदामध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख एकदा नव्हे दोनवेळा कार्यक्रमासाठी आले. पण ते घरी आले नाहीत. त्यांची मर्जी ते आले नाहीत. त्यांनी फोनही केला नाही. एसएमएसही केला नाही किंवा संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. माझ्या आईसाठी त्यांनी त्या व्यक्त केल्या पाहिजे होत्या असा माझा आग्रही नाही. पण मी हे विसरणार नाही", असं आशिष शेलार म्हणाले.