मुंबई - मराठा आरक्षणाला गेल्या 5 वर्षात योग्य न्याय मिळाला नाही, नारायण राणे समितीने जो अहवाल बनवला तो अभ्यासपूर्ण होता, सखोल अभ्यास करुन राणे समितीने तो अहवाल बनवला होता. मात्र राणेंना श्रेय मिळू नये म्हणून घाणेरडे राजकारण केले गेले असा आरोप काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी केला आहे तसेच मागील 5 वर्षे मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाची या सरकारने फसवणूक केली असल्याचंही त्यांनी सांगितले.
या मुलाखतीत बोलताना नितेश राणे म्हणाले की, एक मुलगा म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून मी बोलतोय राणे समितीने बनवलेला अहवाल योग्यच होता. मागासवर्गीय अहवाल आणि राणे समितीचा अहवाल मी नजरेसमोर ठेवले, तज्ज्ञांशी बोललो, तीन तास अभ्यास केला त्यानंतर मागासवर्गीय अहवाल आणि राणे समितीने बनवलेला अहवाल याची तुलना केली. न्यायालयात राणे समितीचा अहवालाच्या आधारे राज्य सरकारने कोर्टात बाजू मांडली असती तर 5 वर्षे वाया गेले नसती, मराठा लोकांचे बळी गेले नसते. राणेंना श्रेय मिळू नये यासाठी घाणेरडे राजकारण केलं गेलं असा आरोप नितेश राणेंनी केला.
तसेच आरक्षणाचं समर्थन करणारे नेते आहोत, मराठा लोकांना जेव्हा आरक्षण जाहीर केलं तेव्हाच मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केलं होतं मात्र या सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे मुस्लिम तरुणांच्या जीवनाचं नुकसान झालं. धनगर आरक्षणाच्या बाबतीत तर राज्य सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार असं आश्वासन दिलं मात्र 5 वर्षात काहीच मिळालं नाही याचं सत्य धनगर समाजाला माहीत पडलं आहे. धनगर समाजाला राज्य सरकारवर विश्वास नाही, शब्द न पाळणारं सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं. त्याचे प्रतिबिंब येणाऱ्या निवडणुकीत दिसेल असा दावा नितेश राणेंनी केला.
राज्य सरकारने फसवणूक केली असतानाही आपण भाजपसोबत आहात अशी टीका तुमच्यावर केली जाते यावर नितेश राणेंनी उत्तर दिले. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे. देशाला योग्य दिशेने घेऊन जायचं असेल तर मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे आम्ही भाजपासोबत आहोत. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी कुठल्याही मराठी माणसाची इच्छा आहे. मात्र राजकीय परिस्थिती आणि वस्तुस्थिती तशी नाही. मोठ्या प्रमाणात लोकांना वाटतंय की नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा निवडून द्यावं असं नितेश राणे यांनी सांगितले.
(Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम')
(Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण)
(Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा)
पहा व्हिडीओ