Sanjay Raut: मुख्यमंत्री पदापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच माझ्या दृष्टीनं सर्वोच्च पद आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. संजय राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या नारायण राणेंच्या वादासह विविध राजकीय विषयांवर 'रोखठोक' भाष्य केलं.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये नेमकं कोण वरचढ दिसतंय? असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद असल्याचं विधान केलं आहे. "मी नेहमी पक्ष प्रमुखांना वरचढ मानतो. ते मुख्यमंत्री आहेत हा योगायोग आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हे आजही सर्वोच्च पद आहे. जसं बाळासाहेब म्हणायचे की शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद आहे. तसं आजही मी मानतो की शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद आहे", असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेवर टीका करणं हाच राणेंचा 'सूक्ष्म' उद्योग आहे का?नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. भाजपानं त्यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ओळखून त्यांनी खात्याचं काम करावं. त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा 'सूक्ष्म' उद्योग करण्यासाठी केंद्रीय मंत्री केलंय का? राणेंचं ते काम नाही. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं काम पाहावं, असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.