Join us

Exclusive : शिवसेनेमुळेच हाेताेय बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार - शशांक राव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:21 PM

BEST Strike : बेस्ट कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाचा आज चाैथा दिवस. महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये गेले चार दिवस चर्चा सुरू असूनही काेणताच ताेडगा निघालेला नाही.

ठळक मुद्देबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

- शेफाली परब-पंडित 

बेस्ट कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाचा आज चाैथा दिवस. महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये गेले चार दिवस चर्चा सुरू असूनही काेणताच ताेडगा निघालेला नाही. त्यात मुंबईकर जनताही भरडली जात आहे. गुरूवारी झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतरही बैठक निष्फळ ठरली. यामुळे बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार हाेण्याची भीती आता व्यक्त हाेऊ लागली आहे. याबाबत बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांच्याबराेबर केलेली ही बातचित :

1. काेणत्या मागण्यांवर चर्चा अडली आहे?

- एकही मागणी मान्य झालेली नाही. केवळ चर्चा आणि चर्चाच सुरू आहे. ताेडगा नाहीच. महापालिकेच्या महासभेत बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलिनीकरण करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. हा ठराव मान्य करायला आयुक्त अजॉय मेहता चक्क नकार देत आहेत. हे आडमुठे धाेरण कशासाठी?

2.बेस्ट उपक्रमावर आजही वेळ का आली. याला काेण जबाबदार?

महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे बेस्ट उपक्रमावर आणि आयुक्तांवर नियंत्रण नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर प्रश्न सुटेल, असे वाटत हाेते. पण कामगारांच्या मागणीपत्रावर प्रशासनाकडून काेणता प्रस्तावच नाही तर चर्चा आणि तडजाेड कशावर करणार.

3.  पण कामगारांवर कारवाई हाेतेय? त्यांचा गिरणी कामगार हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

ते शिवसेनेने ठरवावे त्यांना बेस्टच्या कामगारांचा गिरणी कामगार करून दाखवायचा आहे का? असे पण मरतच आहाेत तर लढून मरू, या तयारीनेच कामगार संपात उतरले आहेत. दर महिन्याचा पगार वेळेत हातात पडत नाही, त्यामुळे कर्ज घ्यावे लागते. पंधरवड्यानंतर मिळालेला पगार कर्ज फेडण्यात जाताे. त्यात मुलांचे शिक्षण, औषधपाण्याचा खर्च, कामगारांनी जगायचे तरी कसे? 

4. सामान्य जनता यात भरडली जातेय?

त्याबद्दल आम्ही मुंबईकरांची माफी मागताे आणि दिलगिरी व्यक्त करताे. पण त्यांना विनंती आहे, बेस्ट कामगारही तुमचेच बांधव आहेत, त्यांना समजून घ्या, त्यांच्या पाठीशी उभे रहा.

5. राज्य सरकार का गप्प आहे, त्यांची जबाबदारी वाटत नाही का?

शिवसेनाही राज्यात सत्तेत भागिदार आहेच ना. मग त्यांना निर्णय घेणे एवढे जड का जातेय? बेस्टमध्ये बहुतांशी मराठी बांधव आहेत. त्यांना रस्त्यावर आणणार का? आयुक्त ऐकत नसतील तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणा. पण कामगारांचे हाल थांबवा, त्यांना न्याय मिळवून द्या. 

टॅग्स :बेस्टसंपमुंबई