वीज बील माफ करा; अन्यथा झोप मोड आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:21 PM2020-07-08T18:21:57+5:302020-07-08T18:22:20+5:30
जून महिन्यात आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले...
मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले असून, ही वीज बिले अव्वाच्या सव्वा आहेत. दूर्देव म्हणजे लॉकडाऊनमुळे बहुतांशी लोक घरी असून, अनेकजण आर्थिक संकटात आहेत. अशावेळी किमान २०० युनिटपर्यंतचे वीज माफ करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महत्त्वाचे याबाबत निर्णायक भूमिका घेतली नाही तर गांधीगिरी स्टाईलने झोप मोड आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मराठी भारतीच्या अध्यक्षा पूजा बडेकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे गोरगरीबांना रोजगार नाही. घरात खायला दाणा नाही. जगतोय की मरतोय हा प्रश्न असताना सरकारला त्यांच्याकडून वीज बिल मागताना काहीच कसे वाटत नाही. गोर गरिबांची वीज बिले माफ करण्याची गरज असून, असे केले नाही तर गांधीगिरी स्टाईलने आंदोलन छेडले जाईल. आज केरळ, दिल्लीमध्ये कोरोनाच्या काळातील लोकांची अडचण समजून बिलात सवलत दिली जात आहे. तिथे महाराष्ट्र जनतेला समजून घेण्यास का मागे का? असाही सवाल केला जात आहे.
दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावीत, यासाठी १३ जुलै रोजी जिल्हा व तालुका पातळीवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली.