मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व गरीब जनतेचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे. संपूर्ण वीज बिल माफी शक्य नसल्यास ५० टक्केच वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
लॉकडाउनमुळे सामान्य गरीब वर्ग संकटात सापडला आहे. त्याला वीज बिल माफी मिळायला हवी. मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणाºया अदानी कंपनीने १८ टक्के वीज बिल माफ केले आहे. त्यांना आणखी बिल माफ करण्याचे आवाहन केल्याचे आठवले यांनी सांगितले. मुंबई शहरात वीज पुरवठा ‘बेस्ट’ कडून केली जाते. यासाठी मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये ठराव करावा. त्याद्वारे तीन महिने वीजबिल किमान ५० टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे आवाहन आठवले यांनी केले आहे. तसेच पुढील चार महिने थकबाकीमुळे कोणाचीही वीज तोडणी करू नये, अशी सूचनाही आठवले यांनी वीज कंपन्यांना केली आहे.
वीजबिल माफ करण्यासोबतच कोरोनाची किंवा अल्प दरात चाचणी करावी. सध्या कोरोना चाचणीसाठी पाच हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्या ऐवजी मोफत किंवा पाचशे रूपयात ही चाचणी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणा असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. डॉक्टरांप्रमाणे रुग्णालयातील नर्सेसना सुद्धा व्यक्तिगत सुरक्षा किट मिळायला हवेत, अशी मागणी आठवले यांनी केली.