सीआयडीची मलबार हिल पोलिसांना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरुद्धच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मुंबई पोलिसांना केली आहे. त्यांचे शासकीय निवासस्थान मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या पोलिसांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांचे हे घर बंद असल्याने एक पोलिसांचे पथक त्यांच्या चंदीगड येथील मूळ गावी पाठविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीआयडीच्या पोलीस अधीक्षकांनी मलबार हिल पोलिसांना पत्र लिहून पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. होमगार्डमध्ये उचलबांगडी केलेले परमबीर सिंह एप्रिल महिन्यापासून मुंबईबाहेर आहेत. सुरुवातीला आठ दिवस रजा घेतल्यानंतर त्यांनी चंदीगड येथे उपचार घेत असल्याचे सांगून सातत्याने आजारी रजा वाढवून घेतली आहे. सध्या चंदीगड येथील निवासस्थानही बंद असल्याचे सांगण्यात येते. परमबीर हे चंदीवाल चौकशी आयोगाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने गेल्या आठवड्यात आयोगाने समन्स जारी केले आहे. आता परमबीर यांच्यावरील खंडणी व ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सीआयडीलाही त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. त्यामुळे मलबार हिल वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांच्या घरी वॉरंट देण्यासाठी दोन पोलिसांची मदत मागितली आहे.