शाळांमधून छडीची शिक्षा हद्दपार करा, मार्गदर्शक सूचनांवरील कार्यवाहीचे शिक्षण विभागाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:14 AM2018-07-08T06:14:24+5:302018-07-08T06:14:42+5:30
शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशा प्रकारची शिक्षा करता कामा नये, अशी तरतूद शिक्षण बालहक्क कायद्यात आहे.
मुंबई - शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशा प्रकारची शिक्षा करता कामा नये, अशी तरतूद शिक्षण बालहक्क कायद्यात आहे. त्यानुसार, शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्याबाबत प्राचार्य, शिक्षक, मुख्यध्यापकांसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. आता या सूचनांनुसार शाळांमध्ये अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे बालहक्क आयोगाने शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यामुळे यावर कार्यवाही करावी, असे आदेश शनिवारी शिक्षण विभागाने शाळा व शिक्षण उपसंचालकांना दिले
आहेत.
‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’ हे कालबाह्य झाले आहे. उलट विद्यार्थ्यांना अशी शारीरिक शिक्षा करणाऱ्या किंवा मानसिक त्रास देणाºया शिक्षकांना दंड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बालहक्क संरक्षण आयोगानेदेखील काही सूचना तयार करून, त्या शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार,
या मार्गदर्शक सूचना कार्यशाळांद्वारे सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांच्या निदर्शनास आणून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. सोबतच या संदर्भातील अहवालही शिक्षण संचलनालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षक, मुख्याध्यापक संभ्रमात
बालकांना छडीने मारणे, हे अमानुषपणाचे लक्षण आहेच. मात्र, सर्व शिक्षणतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंशिस्त पूर्णत: निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे व्रात्य व बेशिस्त मुलांना शिस्त कशी लावावी, हा प्रश्न शिक्षक व मुखाध्यापकांपुढे उभा राहिल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली. जे विद्यार्थी बेशिस्त वागतात, त्यांच्या बेशिस्तीला आवर घालण्यासाठी नेमके काय करावे, याच्या उपाययोजनाही सुचवाव्यात, असे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले.