‘कुर्ला बलात्कारातील आरोपीला फाशी द्या’

By admin | Published: September 11, 2015 01:56 AM2015-09-11T01:56:35+5:302015-09-11T01:56:35+5:30

कुर्ला नेहरू नगर येथे २०१० मध्ये तीन शाळकरी मुलींची अपहरणानंतर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. यातील एका गुन्ह्यात पोलिसांनी जावेद शेख या आरोपीला अटक केली.

Execution of Kurla rape accused | ‘कुर्ला बलात्कारातील आरोपीला फाशी द्या’

‘कुर्ला बलात्कारातील आरोपीला फाशी द्या’

Next

मुंबई : कुर्ला नेहरू नगर येथे २०१० मध्ये तीन शाळकरी मुलींची अपहरणानंतर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. यातील एका गुन्ह्यात पोलिसांनी जावेद शेख या आरोपीला अटक केली. बुधवारी या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मात्र पीडित कुटुंबीयांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी करण्यासाठी कुटुंब उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.
नेहरू नगर पोलीस ठाण्याशेजारीच असलेल्या एका इमारतीच्या गच्चीवर ६ फेब्रुवारी २०१०ला सानिया शेख या चिमुरडीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर महिन्याभरातच पोलीस वसाहतीमधील गच्चीवर अंजली जैस्वाल या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नेहरू नगर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव वाढू लागला. शिवाय रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण होते. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असतानाच ६ जूनला पुन्हा एकदा याच परिसरातील नुसरत शेख या चिमुरडीचे अपहरण झाले. या मुलीचादेखील पोलिसांनी कसून शोध घेतला. मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. अखेर १४ दिवसांनी येथील वत्सलाताई नगरातील एका बंद खोलीत या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. तिन्ही मुलींचे अपहरण केल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर बलात्कार करून हत्या केली होती. त्यामुळे या तिन्ही घटनांनंतर संपूर्ण मुंबई शहर हादरून गेले होते.
पोलिसांवरील वाढता दबाव लक्षात घेत आरोपींना पकडण्यासाठी २७ पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने परिसरातील सुमारे १ हजारपेक्षा अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. तसेच या सर्वांची डीएनए चाचणीदेखील केली होती. या वेळी आरोपी जावेद शेख या आरोपीचे डीएनए नमुने नुसरत शेख या चिमुरडीशी मिळाले. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला अटक केली.
आठ दिवसांपूर्वीच सत्र न्यायालयाने या आरोपीला दोषी ठरवले होते. त्यानंतर बुधवारी या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर शेख कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याची माहिती नुसरतचे वडील खुर्शिद शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Execution of Kurla rape accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.