मुंबई - क्रुझवरील पर्यटक बहुतांशवेळेस इ- व्हीसादवारे येतात. इ व्हिसावर येणाऱ्या पर्यटकांची बायोमेट्रिक चाचणी घेतली जाते. मात्र एका क्रुझवरुन ३ ते ४ हजार पर्यटक येतात. एका व्यक्तीच्या बायोमेट्रिक चाचणीस ७ ते ८ मिनिटे लागतात. त्यामुळे सर्व पर्यटकांची चाचणी होण्यास भरपूर वेळ गेला असता. मात्र आता पुढील तीन वर्षांसाठी या चाचणीतून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई भेटीवर आलेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय पोर्ट्स, शिपिंग अँड लाँजिस्टिक्स परिषदेत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी याबाबत माहिती दिली. बायोमेट्रिक चाचणीतून सवलत देण्याच्या निर्णयामुळे पर्यटन आणि क्रुझसाठी मोठा फायदा होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये ५५,००० क्रुझ पर्यटकांनी मुंबईला भेट दिली. भारतात प्रतिवर्षी ४० लाख पर्यटक क्रुझच्या माध्यमातन येऊ शकतात आणि त्यातील ३० लाख पर्यटक फक्त मुंबईत येऊ शकतात असे अभ्यास अहवालाद्वारे दिसून आले आहे. त्यामुळे क्रुझ पर्यटकांचा वाढता ओघ पाहाता मुंबई पोर्ट ट्रस्टद्वारे विविध योजना पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत, असेही भाटिया म्हणाले.क्रुझ पर्यटन वाढिस लागावे यासाठी पोर्ट चार्जेसमध्ये जवळपास ६०% घट केली आहे, त्याचप्रमाणे इतर अडथळेही वेगाने दूर करण्यात येत आहेत. इंटरनँशनल क्रुझ टर्मिनल एक ते दीड वर्षात पूर्णत्वास जाईल अशी आशाही भाटिया यांनी व्यक्त केली. सागरमाला आणि भारतमाला या दोन प्रकल्पांमुळे बंदरांचा विकास वेगात होईल आणि गुंतवणुकीचा ओघ वाढेल. मँग्नेटिक महाराष्ट्र् या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातील बंदरांचा वाटा लक्षणीय असेल आणि रोजगार निर्मितीलाही ते हातभार लावतील असे भाटिया यांनी यावेळी नमूद केले. शुक्रवारी कोस्टा निओ क्लासिका या क्रुझवर भारतातील पहिलीच उद्योग परिषद झाली. यावेळेस टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नोएल टाटा, शिपिंग मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल मालिनी शंकर, जेएनपीटीचे अध्यक्ष नीरज बन्सल, भारत सरकारमध्ये विशेष सचिवपदी कार्यरत असणारे प्रणवकुमार दास असे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातील उद्योजक उपस्थित होते.
इ व्हीसाद्वारे येणाऱ्या क्रुझवरील पर्यटकांना बायोमेट्रिकच्या चाचणीमधून सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 4:24 PM