- रोहित नाईक
मुंबई : राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये (आरडी परेड) दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्तव्यपथावर राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विशेष पथक सहभागी होत आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये नारी शक्तीची थीम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या एनएसएस पथकात केवळ मुलींचा सहभाग आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे केवळ ३ अंश तापमान इतक्या कडाक्याच्या थंडीत महिनाभर संचलनाचा सराव होत असून यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या रश्मी तिवारी आणि ब्युटी सिंग या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
एनएसएस म्हणजे केवळ समाजसेवा नसून तो व्यक्तिमत्त्व विकासाचा अनोखा मार्ग असल्याचे हे पथक सिद्ध करेल. रश्मी ही कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाची, तर ब्युटी ही चेंबुर येथील विवेकानंद एज्युकेश सोसायटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. देशभरात प्रत्येक महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एनएसएस विभागाचे १९८८ सालापासून दरवर्षी कर्तव्यपथावर संचलन होते. तेव्हापासून यंदाही मुंबई विद्यापीठाने आपल्या सहभागाची परंपरा कायम राखली आहे.
या संचलन पथकात देशभरातून २०० विद्यार्थिनींची निवड झाली असून यापैकी १४४ विद्यार्थिनी कर्तव्यपथावर संचलन करतील आणि यामध्ये रश्मी व ब्युटी या दोघींचीही निवड झाली आहे.
सैन्याच्या शीख रेजिमेंट्सच्या जवानांकडून या पथकाला संचलनाचे धडे मिळत आहेत. याबाबत रश्मी व ब्युटी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सैनिकांकडून शिकण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. त्यांनी दिलेल्या शिस्तीच्या धड्यामुळेच आम्ही कडाक्याच्या थंडीतही वेळेचे तंतोतंत पालन करत सराव करतो. तसेच, विविध राज्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधल्याने खूप नवी माहिती मिळते.
मुंबई विद्यापीठाने कर्तव्यपथावरील आपल्या सहभागाची परंपरा कायम राखल्याचा अभिमान आहे. समाजसेवा ही एनएसएसची ओळख आहेच, पण कर्तव्यपथावर या विद्यार्थ्यांचा दिमाखदार रुबाबही दिसून येईल. या सर्व एनएसएस स्वयंसेवकांचा आम्हाला अभिमान आहे. - सुशील शिंदे, विशेष कार्याधिकारी एनएसएस - मुंबई विद्यापीठ